सुप्रसिद्ध व्यावसायिक व MindTree या यशस्वी कंपनीचे प्रवर्तक सुब्रोतो बागची यांच्या गाजलेल्या ‘The PROFESSIONAL’ या पुस्तकाची मराठी आवृत्ती म्हणजे ‘मैत्री व्यावसायिकतेशी’! सुब्रोतो बागची यांच्या अंतर्मनाचा आविष्कार आणि त्यांच्या प्रदीर्घ अनुभवांवर आधारित त्यांचे विचार या पुस्तकात अंतर्भूत आहेत. केवळ व्यवसाय करणे आणि तो व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून करणे यात फरक आहे. यशस्वी होण्याच्या वृत्तीबरोबरच व्यावसायिक वृत्ती अंगी बाणावी लागते. व्यावसायिकता म्हणजे त्यात विशिष्ट पद्धती रूढ करणं आलं, सचोटी आली, भविष्याचा वेध घेणं आलं आणि त्यात विकास साधणंही आलं. तसंच उत्तम नियोजन करणं आणि कामाची शिस्त पाळणंही आलं. त्याचप्रमाणे काही मूल्य जोपासणही आलं. व्यावसायिकता म्हणजे केवळ प्रचंड नफा मिळवणं नव्हे, तर उच्च नीतिमूल्यांची जोपासना करून उत्तम नियोजनातून तो मिळविणं. सुब्रोतो बागची या पुस्तकात व्यावसायिकता कशी जोपासावी, हे कधी सूचकपणे तर कधी अनुभवांच्या आधारे सांगतात. सर्व व्यावसायिकांना, उद्योजकांना किंवा तो करू इच्छिणार्यांना, तसेच महत्त्वाकांक्षी नोकरदारांनाही हे पुस्तक मौलिक मार्गदर्शन करणारं ठरेल.